भुलाबाई हा विदर्भ, खानदेश आणि मराठवाड्यातील भागांत भाद्रपद पौर्णिमेपासून शरद (कोजागिरी) पौर्णिमेपर्यंत, सुमारे एक महिना साजरा होणारा लोकोत्सव आहे. या काळात लहान मुली रोज संध्याकाळी एकत्र जमून माती किंवा लाकडाच्या घरकुलात भुलाबाईची (देवी पार्वतीची) स्थापना करून ही पारंपरिक गाणी म्हणतात. खाली या उत्सवातील प्रचलित गाणी मराठीत दिली आहेत; हीच गाणी रोमन लिपीत वाचायची असल्यास इंग्रजीतील पान येथे पाहा.
See in Bhulabai chi gani in english here
1. पहिली गं भुलाबाई
पहिली गं भुलाबाई देवा देवा साथ दे साथीला खंडोबा खेळी खेळी खंडोबा खंडोबाच्या दारी बाई वर्षां वर्षां अवसणी अवसणीचं पाणी जसं गंगेचं पाणी गंगेच्या पाण्याने वेळवीला भात जेविता कंठ राणा भुलाबाईचा ठोकीला राळा हनुमंत बाळा हनुमंत बाळाचे लांब लांब झोके टिकाऊचे डोळे हात पाय गोरे भाऊ भाऊ टकसनी माथापुढं झळसणी झळकतीचे एकच पान दुरून भुलाबाई नमस्कार एवढीशी गंगा झुळझुळ वाहे ताव्या पितळी नाय गं हिरवी टोपी हाय गं हिरवी टोपी हरपली सरपाआड लपलो सरपदादा बेटिले जाई आंवा पिकला जाई नव्हे जुई नव्हे चिंचाखालची रानुबाई चिंचा तोडीत जाय गं पाच पानं खाल्ली गं खाता खात रंगली तळय़ात घागर बुडाली तळय़ा तळय़ा ठाकुरा भुलाबाई जाते माहेरा जाते तशी जाऊ द्या तांव्याभर पाण्याने न्हाऊ द्या बोटभर कुंकू लावू द्या तांबडय़ा घोडय़ावर बसू द्या तांबडय़ा घोडय़ाचे उलटे पाय आउले पाऊल नागपूर गांव नागपूर गावचे ठासे ठुसे वरून भुलाबाईचे माहेर दिसे
2. घरावर घर बत्तीस घर
घरावर घर बत्तीस घर इतका कारागीर कोणाचा भुलोजी च्या राणीचा भूलोजीची राणी भरत होती पाणी धावा धावा कोणी धावतील तिचे दोनी दोनी गेले ताकाला विंचू चावला नाकाला
3. नदीच्या काठी राळा पेरला
नदीच्या काठी राळा पेरला, बाई राळा पेरला एके दिवशी काऊ आला, बाई काऊ आला एकच कणीस तोडून नेल, बाई तोडून नेल सईच्या अंगणात टाकून दिल, बाई टाकून दिल सईन उचलून घरात नेल, बाई घरात नेल कांडून कुंडून राळा केला, बाई राळा केला राळा घेऊन बाजारात गेली, बाई बाजारात गेली चार पैशाची घागर आणली, बाई घागर आणली घागर घेऊन पाण्याला गेली, बाई पाण्याला गेली मधल्या बोटाला विंचू चावला, बाई विंचू चावला
4. आला गं सासरचा वैद्दय
आला गं सासरचा वैद्दय हातात काठी जळक लाकूड पायात जोडा फाटका तुटका नेसायचं धोतर फाटक तुटक अंगात सदरा मळलेला डोक्यात टोपी फाटकी तुटकी तोंडात विडा शेणाचा कसा गं दिसतो बाई म्हायरावाणी, गं बाई म्हायरावाणी आला गं माहेरचा वैद्दय हातात काठी पंचरंगी पायात जोडा पुण्यशाई नेसायचं धोतर जरीकाठी अंगात सदरा मलमलचा डोक्यात टोपी भरजरी तोंडात विडा लालेला कसा गं दिसतो बाई राजावाणी, गं बाई राजावाणी
5. सा बाई सू (बेलाच्या झाडाखाली)
सा बाई सु, सा बाई सु, बेलाच्या झाडाखाली महादेवा तू रे महादेवा तू हार गुंफिला, विडा रंगीला झेंडुची फुले माझ्या भुलाबाईला रे माझ्या भुलाबाईला॥ सा बाई सु, सा बाई सु, बेलाच्या झाडाखाली महादेवा तू रे महादेवा तू हार गुंफिला, विडा रंगीला गुलाबाचे फूल माझ्या भुलाबाईला रे माझ्या भुलाबाईला॥ सा बाई सु, सा बाई सु, बेलाच्या झाडाखाली महादेवा तू रे महादेवा तू हार गुंफिला, विडा रंगीला मोगऱ्याची फुले माझ्या भुलाबाईला रे माझ्या भुलाबाईला॥
6. यादवराया राणी
यादवराया राणी घरास येईना कैसी सासूरवाशीण सून रूसून बसली कैसी सासूबाई गेल्या समजावयाला चल चल सूनबाई अपुल्या घराला अर्धा संसार देते तुजला मी नाही यायची अपुल्या घराला यादवराया राणी घरास येईना कैसी सासूरवाशीण सून रूसून बसली कैसी सासरे गेले समजावयाला चल चल सूनबाई अपुल्या घराला तिजोरीची चावी देतो तुजला मी नाही यायची अपुल्या घराला यादवराया राणी घरास येईना कैसी सासूरवाशीण सून रूसून बसली कैसी दीर गेले समजावयाला चला चला वहिनी अपुल्या घराला नवीन कपाट देतो तुम्हाला मी नाही यायची अपुल्या घराला यादवराया राणी घरास येईना कैसी सासूरवाशीण सून रूसून बसली कैसी जाऊ गेली समजावयाला चला चला जाऊबाई अपुल्या घराला जरीची साडी देते तुम्हाला मी नाही यायची अपुल्या घराला यादवराया राणी घरास येईना कैसी सासूरवाशीण सून रूसून बसली कैसी नणंद गेली समजावयाला चल चल वहिनी अपुल्या घराला चांदीचा मेखला देते तुजला मी नाही यायची अपुल्या घराला यादवराया राणी घरास येईना कैसी सासूरवाशीण सून रूसून बसली कैसी पती गेला समजावयाला चल चल राणी अपुल्या घराला लाल चाबूक देतो तुजला मी येते अपुल्या घराला यादवराया राणी घरास आली कैसी सासूरवाशीण सून घरास आली कैसी
7. आपे दूध तापे
आपे दूध तापे, त्यावर पिवळी साय, लेकी भुलाबाई साखऱ्या लेवून जाय कशी लेवून जाय, कशी लेवू दादा, घरी नंदा जावा, करतील माझा हेवा नंदाचा बैल येईल डोलत, सोन्याचं कारलं साजीरं बाई, गोजीरं नंदा भावजया दोघीच जणी बाई दोघीच जणी, शिंक्यावरचं लोणी खाल्लं कुणी खाल्लं कुणी तेच खाल्लं वहिनींनी, वहिनींनी, आता माझे दादा येतील गं, येतील गं, दादाच्या मांडीवर बशील गं, बशील गं, दादा तुमची बायको चोट्टी चोट्टी असू दे माझी चोट्टी चोट्टी घे काठी लगाव पाठी घरादाराची लक्षी मोठ्ठी मोठ्ठी ॥
8. अडकित जाऊ खिडकीत जाऊ
खिडकीत होतं ताम्हन भुलोजीला मुलगा झाला, नाव ठेवा वामन अडकित जाऊ, खिडकीत जाऊ खिडकीत होता बत्ता भुलोजीला मुलगा झाला, नाव ठेवा दत्ता अडकित जाऊ, खिडकीत जाऊ खिडकीत होती वांगी भुलोजीला मुलगी झाली, नाव ठेवा हेमांगी अडकित जाऊ, खिडकीत जाऊ खिडकीत होती दोरी भुलोजीला मुलगी झाली, नाव ठेवा गौरी अडकित जाऊ, खिडकीत जाऊ खिडकीत होती पणती भुलोजीला मुलगी झाली, नाव ठेवा मालती अडकित जाऊ, खिडकीत जाऊ खिडकीत होती घागर भुलोजीला मुलगा झाला, नाव ठेवा सागर
9. अक्कण माती चिक्कण माती
अक्कण माती चिक्कण माती अश्शी माती सुरेख बाई जातं ते रोवावं अस्सं जातं सुरेख बाई सपिटी दळावी अश्शी सपिटी सुरेख बाई करंज्या कराव्या अश्शा करंज्या सुरेख बाई तबकी ठेवाव्या अस्सं तबक सुरेख बाई शेल्याने झाकावं अस्सा शेला सुरेख बाई पालखी ठेवावा अश्शा पालखी सुरेख बाई माहेरी धाडावी अस्सं माहेर सुरेख बाई खेळाया मिळतं अस्सं सासर द्वाड बाई कोंडूनी मारितं
10. ऐलमा पैलमा गणेश देवा
ऐलमा पैलमा गणेश देवा, माझा खेळ मांडू दे, करीन तुझी सेवा माझा खेळ मांडिला वेशीच्या दारी, पारवा घुमतोय पारावरी गोदावरी काठच्या उमाजी नायका, आमच्या गावच्या भुलोजी बायका एविनी गा तेविनी गा आमच्या आया तुमच्या आया खातील काय दुधोंडे दुधोंड्याची लागली टाळी, आयुष्य देरे भामाळी माळी गेला शेताभाता, पाऊस पडला येताजाता पडपड पावसा थेंबोथेंबी, थेंबोथेंबी आडव्या लोंबी लोंब्या लोंबती अंगणी, अंगणा तुझी सात वर्ष, भोंडल्या तुझी सोळा वर्ष अतुल्या मातुल्या चरणी चातुल्या चरणी चारचोंडे हातपाय खणखणीत गोंडे एकेक गोंडा वीसवीसाचा, साड्या डोंगर नेसायचा नेसा ग नेसा बाहुल्यांनो, अडीचशे पावल्यांनो
11. एक लिंबू झेलू बाई
एक लिंबू झेलू बाई दोन लिंब झेलू दोन लिंब झेलू बाई, तीन लिंब झेलू तीन लिंब झेलू बाई, चार लिंब झेलू चार लिंब झेलू बाई, पाच लिंब झेलू पाचा लिंबाचा पानोठा, माळ घालू हनुमंता हनुमंताची निळी होडी येता जाता कमळ तोडी कमळाच्या पाठीमागे लपली राणी अग अग राणी इथे कुठे पाणी पाणी नव्हे यमुना जमुना यमुना जमुनाची बारीक वाळू तेथे खेळे चिल्लार बाळू चिल्लार बाळाला भूक लागली मी तर जाते सोनार वाडा सोनार दादा सोनार दादा गौरीचे मोती झाले का नाही गौरीच्या घरी तांब्याच्या चुली भोजन घातले आवळीखाली उष्टया पत्रावळी चिंचेखाली पान सुपारी उद्या दुपारी
12. काळा कोळसा झुकझुक पाना
काळा कोळसा झुकझुक पाना पालखीत बसला भुलोजी राणा भुलोजी राण्याचे कायकाय आले सारे पिंपळ एक पान एक पान दरबारी दुसर पान शेजारी शेजाऱ्याचा डामा डुमा वाजतो तसा वाजू द्या आम्हाला खेळ मांडू द्या खेळात सापडली लगोरी लगोरी गेली वाण्याला वाण्या वाण्या सोपा दे सोपा माझ्या गाईला गाई गाई दुध दे दुध माझ्या बगळ्याला बगळ्या बगळ्या गोंडे दे तेच गोंडे लेऊ सासर जाऊ सासरच्या वाटे कुचू कुचू दाटे पंढरीच्या वाटे नारळ फुटे
13. काळी चंद्रकला नेसू कशी
काळी चंद्रकला नेसू कशी, नेसू कशी जाईच तेल आणू कशी, आणू कशी जाईच तेल आणल, आणल सासूबाईच न्हाण झाल वन्साबाईची वेणी झाली मामाजीची शेंडी झाली उरलेलं तेल झाकून ठेवलं रानोबाचा पाय पडला सासूबाई सासूबाई अन्न द्या दुधभात जेवायला द्या आमच उष्ट तुम्ही खा विडा घेऊन खेळायला जा
14. आमचे मामा व्यापारी
आमचे मामा व्यापारी व्यापारी तोंडात चिक्कण सुपारी सुपारी सुपारी काही फुटेना फुटेना मामा काही उठेना उठेना सुपारी गेले गडगडत गडगडत मामा आले बडबडत बडबडत सुपारी गेली फुटून फुटून मामा आले उठून उठून
15. कारल्याची बी पेर (सुनबाई-सासूबाई)
कारल्याची बी पेर ग सुनबाई, मग जा अपुल्या माहेरा माहेरा कारल्याची बी पेरली हो सासूबाई, आता तरी धाडा ना धाडा ना कारल्याला कोंब येऊ दे ग सुनबाई, मग जा अपुल्या माहेरा माहेरा कारल्याला कोंब आल हो सासूबाई, आता तरी धाडा ना धाडा ना कारल्याला वेल येऊ दे ग सुनबाई, मग जा अपुल्या माहेरा माहेरा कारल्याला वेल आला हो सासूबाई, आता तरी धाडा ना धाडा ना कारल्याला फुल येऊ दे ग सुनबाई, मग जा अपुल्या माहेरा माहेरा कारल्याला फुल आले हो सासूबाई, आता तरी धाडा ना धाडा ना कारल्याला कारले लागू दे ग सुनबाई, मग जा अपुल्या माहेरा माहेरा कारल्याला कारले लागले हो सासूबाई, आता तरी धाडा ना धाडा ना कारल्याची भाजी कर ग सुनबाई, मग जा अपुल्या माहेरा माहेरा कारल्याची भाजी केली हो सासूबाई, आता तरी धाडा ना धाडा ना कारल्याची भाजी खा ग सुनबाई, मग जा अपुल्या माहेरा माहेरा कारल्याची भाजी खाल्ली हो सासूबाई, आता तरी धाडा ना धाडा ना कारल्याचा गंज घास ग सुनबाई, मग जा अपुल्या माहेरा माहेरा कारल्याचा गंज घासला हो सासूबाई, आता तरी धाडा ना धाडा ना मला काय पुसते, बरीच दिसते, पूस आपल्या सासऱ्याला सासऱ्याला मामंजी मामंजी मला मूड आल, पाठवता की नाही नाही मला काय पुसते, बरीच दिसते, पूस आपल्या दीराला दीराला भाऊजी भाऊजी मला मूड आल, पाठवता की नाही नाही मला काय पुसते, बरीच दिसते, पूस आपल्या जावेला जावेला जाऊबाई जाऊबाई मला मूड आल, पाठवता की नाही नाही मला काय पुसते, बरीच दिसते, पूस आपल्या नणंदेला नणंदेला वन्स वन्स मला मूड आल, पाठवता की नाही नाही मला काय पुसते, बरीच दिसते, पूस आपल्या नवऱ्याला नवऱ्याला पतीराज पतीराज मला मूड आल, पाठवता की नाही नाही आन फणी घाल वेणी, मग जा अपुल्या माहेरा माहेरा आणली फणी घातली वेणी, भुलाबाई गेल्या माहेरा
16. भुलाबाई राणीचे डोहाळे
पहिल्या माशीचा घडवा येतो, येतो रे सडवा सरता सरता नंदन घराच्या, नंदन घराच्या बगिच्यावरी चिंचा बहुत लागल्या, भुलाबाई राणीचे डोहाळे तिचे डोहाळे, तिला बाई नेऊन टाका पलंगावरी पलंग फिरे, चौक फिरे, शंकर बसिले शेजारी ॥१॥ दुसऱ्या माशीचा घडवा येतो, येतो रे सडवा सरता सरता नंदन घराच्या, नंदन घराच्या बगिच्यावरी पेरू बहुत लागले, भुलाबाई राणीचे डोहाळे तिचे डोहाळे, तिला बाई नेऊन टाका पलंगावरी पलंग फिरे, चौक फिरे, शंकर बसिले शेजारी ॥२॥ तिसऱ्या माशीचा घडवा येतो, येतो रे सडवा सरता सरता नंदन घराच्या, नंदन घराच्या बगिच्यावरी संत्री बहुत पिकले, भुलाबाई राणीचे डोहाळे तिचे डोहाळे, तिला बाई नेऊन टाका पलंगावरी पलंग फिरे, चौक फिरे, शंकर बसिले शेजारी ॥३॥ चौथ्या माशीचा घडवा येतो, येतो रे शिरवा सरता सरता नंदन घराच्या, नंदन घराच्या बगिच्यावरी मोसंबी बहुत पिकल्या, भुलाबाई राणीचे डोहाळे तिचे डोहाळे, तिला बाई नेऊन टाका पलंगावरी पलंग फिरे, चौक फिरे, शंकर बसिले शेजारी ॥४॥ पाचव्या माशीचा घडवा येतो, येतो रे सडवा सरता सरता नंदन घराच्या, नंदन घराच्या बगिच्यावरी डाळिंब बहुत पिकले, भुलाबाई राणीचे डोहाळे तिचे डोहाळे, तिला बाई नेऊन टाका पलंगावरी पलंग फिरे, चौक फिरे, शंकर बसिले शेजारी ॥५॥ सहाव्या माशीचा घडवा येतो, येतो रे सडवा सरता सरता नंदन घराच्या, नंदन घराच्या बगिच्यावरी द्राक्ष बहुत पिकले, भुलाबाई राणीचे डोहाळे तिचे डोहाळे, तिला बाई नेऊन टाका पलंगावरी पलंग फिरे, चौक फिरे, शंकर बसिले शेजारी ॥६॥ सातव्या माशीचा घडवा येतो, येतो रे सडवा सरता सरता नंदन घराच्या, नंदन घराच्या बगिच्यावरी आंबे बहुत पिकले, भुलाबाई राणीचे डोहाळे तिचे डोहाळे, तिला बाई नेऊन टाका पलंगावरी पलंग फिरे, चौक फिरे, शंकर बसिले शेजारी ॥७॥ आठव्या माशीचा घडवा येतो, येतो रे सडवा सरता सरता नंदन घराच्या, नंदन घराच्या बगिच्यावरी खरबूज बहुत पिकले, भुलाबाई राणीचे डोहाळे तिचे डोहाळे, तिला बाई नेऊन टाका पलंगावरी पलंग फिरे, चौक फिरे, शंकर बसिले शेजारी ॥८॥ नवव्या माशीचा घडवा येतो, येतो रे सडवा सरता सरता नंदन घराच्या, नंदन घराच्या बगिच्यावरी टरबूज बहुत पिकले, भुलाबाई राणीचे डोहाळे तिचे डोहाळे, तिला बाई नेऊन टाका पलंगावरी पलंग फिरे, चौक फिरे, शंकर बसिले शेजारी ॥९॥
17. आज आमच्या भुलाबाईचा शेवटचा दिवस (सांगता गीत)
आणा आणा पारीस, उगळा उगळा काथ आज आमच्या भुलाबाईचा शेवटचा दिवस शेवटच्या दिवशी बाळाला टोपी मोत्यांनी गुंफली, झो झो रे बाणा बाई बाणा, सुरेख बाणा गाणे संपले, खिरापत आणा आणा आणा लवकर, खाऊ द्या पट्कन
भुलाबाई सणाबद्दल
भुलाबाई म्हणजे देवी पार्वतीचेच एक रूप मानले जाते. अशी कथा सांगितली जाते की पार्वतीने भिल्लीणीचा वेश घेऊन, तपश्चर्येत बसलेल्या शंकराला प्रसन्न करून घेतले; त्या भिल्लरूपी पार्वतीलाच भुलाबाई म्हटले जाते. घरोघरी या काळात भुलाबाईची बाहुली मांडून, संध्याकाळी मुली एकत्र येऊन टाळ्यांच्या किंवा टिपऱ्यांच्या तालावर ही गाणी म्हणतात. गाणी संपल्यावर आरती केली जाते आणि सर्वांना खिरापत (प्रसाद) वाटला जातो. कोजागिरी पौर्णिमेला या महिनाभराच्या उत्सवाची सांगता होते.
गाणी माहिती
| विषय | भुलाबाई (देवी पार्वती) |
| भाषा | मराठी |
| प्रकार | लोकगीत संग्रह (भोंडला / भुलाबाई गाणी) |
| रचयिता | अज्ञात (मौखिक लोकपरंपरा) |
| प्रदेश | विदर्भ, खानदेश, मराठवाडा |
| अवसर | भाद्रपद पौर्णिमा ते कोजागिरी पौर्णिमा (शरद ऋतू) |
नेहमी विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
भुलाबाई म्हणजे काय?
भुलाबाई हे देवी पार्वतीचे एक रूप मानले जाते. भिल्लीणीचा वेश घेऊन शंकराला भुलवणाऱ्या पार्वतीची कथा यामागे सांगितली जाते.
भुलाबाईची गाणी कधी म्हटली जातात?
भाद्रपद पौर्णिमेपासून शरद (कोजागिरी) पौर्णिमेपर्यंत, सुमारे एक महिना, दर संध्याकाळी ही गाणी म्हटली जातात.
ही गाणी कोणत्या भागांत लोकप्रिय आहेत?
प्रामुख्याने महाराष्ट्रातील विदर्भ, खानदेश आणि मराठवाडा या भागांत भुलाबाईचा उत्सव साजरा होतो.
गाणी म्हटल्यानंतर काय केले जाते?
गाणी संपल्यावर आरती म्हटली जाते आणि उपस्थित सर्वांना खिरापत (प्रसाद) वाटला जातो.